समाजातील सर्व नागरिक एकदिलाने एकात्म भावनेतून नांदतात, परस्परांवर विश्वास ठेवतात, त्यांचा परस्परांमध्ये सुसंवाद असतो, मतभेद निर्माण झाले तरी असे मतभेद चर्चेने व न्यायमार्गाने सोडविले जातात. असा समाज शांतताप्रिय व समजूतदार असतो. अशा समाजातील विविध जातीधर्माचे, पंथाचे, विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांचा आदर करतात, त्यांच्या चालीरीती, संस्कृतीविषयी जिव्हाळा - प्रेम बाळगतात, कोणाविषयीही द्वेष-मत्सर बाळगत नाहीत. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. संतांनी दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणारी आहे. सर्वसामान्य जनता धर्म, जात, पंथ वा भाषा याविषयी संकुचित विचारांचे नसतात. अन्यथा महाराष्ट्राचा शिवाजी गायकवाड तथा अभिनेता रजनीकांत तामिळ जनतेच्या हृदयावर राज्य करू शकला नसता. रजनीकांतसारखी असंख्य उदाहरणे आहेत. समाजातल्या सर्व घटकांमध्ये प्रेम आपुलकी असली पाहिजे धर्माचा, जातीचा वा प्रदेशाचा अभिमान असावा परंतु अहंकार व एकमेकांविषयी द्वेष नसावा. आज जगात अनेक ठिकाणी स्वार्थासाठी जाणीवपूर्वक मत्सर आणि द्वेष पसरविला जातोय यामुळे सर्वांचेच नुकसान होते. "Eye for eye Makes whole world Blind" आपल्या स्वार्थासाठी समाजात जाणीवपूर्वक धार्मिक जातीय द्वेष व तेढ निर्माण करणाऱ्या विघातक विचारांना समाजाने थारा देता कामा नये.

समता:

समता ही सुदृढ समाजाची दुसरी महत्त्वाची अट आहे. निसर्गाने वा ईश्वराने मनुष्यासह सर्व प्राणिमात्रांना समान दर्जा दिलेला आहे. ‘Men are born Equal’ समता हे चिरंतन मानवी मूल्य आहे. जिथे समाजात मोठी आर्थिक विषमता असते तो समाज आनंदी नसतो ! थोड्या लोकांना पंचतारांकित तर बहुसंख्य लोकांना मात्र हलाखीचे जीवन ही परिस्थिती बदलली पाहिजे "एकाने हसावे, लाखोंनी रडावे, असे विश्व आता इथे ना-उरावे." जे दुर्बल घटक आहेत त्यांना प्रगतीची अधिक संधी मिळाली पाहिजे, सर्वांनाच चांगल्या जीवनाविषयी स्वप्न पाहता आली पाहिजे व पूर्णही करता आली पाहिजे.

शिक्षण

विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली
गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले
महात्मा फुले यांनी बहुजनांच्या दुर्दशेचे कारण अज्ञान, शिक्षणाचा अभाव हे ठामपणे सांगितले. सामाजिक समतेचे व देशाच्या महासत्तेचे स्वप्न शिक्षणाच्या राजमार्गानेच होऊ शकते सर्वांना जागतिक दर्जाचे प्राथमिक ते उच्च शिक्षण सुलभ रीत्या मिळाले पाहिजे. ही सुदृढ समाज व्यवस्थेची महत्त्वाची गरज आहे. गरीब पददलित समाजाला प्रगतीपथावर आणायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरे साधन नाही युरोपियन राष्ट्रांनी जगावर राज्य केले ते शिक्षण व संशोधनामुळेच!! जी राष्ट्रे शिक्षणावर आपल्या राष्ट्रीय उत्पादनाच्या 6% हून कमी खर्च करतात व संशोधनावर 3% हून कमी खर्च करतात ती राष्ट्रे आर्थिक दृष्ट्या दुर्बल राहतात, अविकसित राहतात.

आर्थिक विकास:

अर्थकारणाचा विचार हा सुदृढ समाजाचा अविभाज्य भाग आहे. सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजांचा आर्थिक उत्पन्नाशी थेट संबंध आहे. सर्व जगात आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे. 10% श्रीमंतांकडे 90% संपत्ती तर 90% लोकांकडे 10% संपत्ती असे भयाण विषमतेचे चित्र आहे. रोजगाराचे प्रश्नही तीव्र होत चालले आहे. आर्थिक व औद्योगिक विकासावर रोजगार निर्मिती अवलंबून असते. दारिद्र्याचा संबंध समाजाच्या आरोग्यासह सर्व बाबींशी असतो. ज्या समाजात गरिबी, दारिद्र्य व आजारांचे प्रमाण मोठे आहे असा समाज सुदृढ कसा होईल?

न्यायव्यवस्था:

राज्यघटनेनुसार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे व मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था चोख असली पाहिजे. शासन प्रशासनावर अंकुश ठेवण्याबरोबरच लोकशाही मूल्यांचे व घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचे रक्षण न्यायपालिकेने करावे हे अपेक्षित आहे. राज्यकर्त्यांकडून वा शासनाकडून राज्यघटनेवर आघात झाला तर न्यायव्यवस्थेने ते होऊ देता कामा नये. न्याय सर्वांना सुलभपणे व सत्त्वर मिळाला पाहिजे. कायदे कठोर असले पाहिजेत व कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे कायदा हा सुदृढ समाजाचा रक्षक आहे.

आरोग्य:

शिक्षणाबरोबरच चांगले आरोग्य ही आता मूलभूत गरज झालेली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे आरोग्यसुविधा प्राधान्याचा विषय झाला आहे. सध्या जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण उदा: हृदयविकार, डमधुमेह, कॅन्सर यांचे प्रमाण चिंताजनक आहे. भारत हा अशा अनेक आजारांची राजधानी आहे. ह्या सर्व गोष्टी योग्य प्रतिबंधात्मक उपाय केल्यास आटोक्यात येऊ शकतात. यासाठी आरोग्य चळवळ सुरु केली पाहिजे. योग्य आहार, व्यायाम, मानसिक शांतता या उपायांनी आजारांना आळा घालता येऊ शकतो. या आजारांचा संबंध केवळ डॉक्टर्स वा हॉस्पिटल्स यांच्याशीच नसतो तर आहार, आर्थिक स्थिती, सार्वजनिक स्वच्छता, प्रदूषण इत्यादी अन्य बाबी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. सर्व नागरिक निरोगी असणे हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे.

सशक्त लोकशाही:

सशक्त लोकशाही हा चांगल्या समाजव्यवस्थेचा आत्मा आहे. स्वातंत्र्य समता व बंधुता ही लोकशाहीची मूल्ये! यावरच समाजाची सुदृढता अवलंबून असते. सर्व नागरिकांना विहार, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. सुदृढ समाजासाठीचे आवश्यक ते सर्व निकष केवळ लोकशाहीतच पूर्ण होऊ शकतात, कारण लोकशाहीत ‘लोक’ केंद्रस्थानी व सर्वश्रेष्ठ असतात. अन्य राज्यपद्धतीत (हुकूमशाही, एकाधिकारशाही, कम्युनिझम) स्वातंत्र्य नसल्याने लोकांच्या आकांक्षा दुय्यम बनतात. लोकशाही सुरक्षित राहावी यासाठी घटनेने संसद, न्यायपालिका, शासन, प्रशासन, निवडणूक आयोग व अन्य संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या हस्तक्षेपापासून सुरक्षित असाव्यात म्हणुन स्वायत्त ठेवलेल्या आहेत. त्यांची स्वायत्तता अबाधित असेल तरच लोकशाही मजबुत राहते, ती कुणाच्या लहरीला व हुकुमशाहीला बळी पडत नाही. सुदृढ समाजात नागरिकांना लोकशाहीचे महत्व पटलेले असते व असे सुबुद्ध नागरीक लोकशाहीच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात.

राष्ट्रीय मुल्ये:

राष्ट्रीय व सामाजिक जीवन मुल्यांवरच समाजाची सुदृढता निर्भर असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत "मी प्रथम भारतीय आहे व शेवटी भारतीयच आहे" धर्म, जात, प्रांत, भाषा या बाह्य गोष्टी आहेत त्यांचा विचार केवळ आपल्या घरापुरताच मर्यादित हवा. सर्व नागरीकांनी ही भावना अत्युच्च मानली पाहिजे. देश म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हेत किंवा पर्वत व नद्या नव्हेत तर देशातील सर्व लोक म्हणजे देश! कुठलाही भेदभाव न करता सर्वाविषयी प्रेम, ममता ठेवणे म्हणजे देश प्रेम! देशाचे सदैव हित जपणे म्हणजे देश प्रेम, देशासाठी सर्वोच्च त्याग म्हणजे देशप्रेम! केवळ अभिनवेश व घोषणा म्हणजे देशप्रेम नव्हे!! राष्ट्राची संपत्ती आपली मानुन तिचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे. शासकिय किंवा खसगी नोकरी करीत असा, व्यवसाय करीत असा वा अन्य काहीही करीत असा आपले काम हे ‘राष्ट्रीय कार्य’ म्हणुन केले पाहिजे. आपण जपानसारखे राष्ट्रप्रेम व कार्यसंस्कृती रुजवली पाहिजे!!

सामाजिक व जीवन मुल्ये:

१) सामाजिक बांधिलकी - समाजातील सर्व घटकांशी विशेषतः दुर्बल घटकांच्या अडचणी, दुःख यांच्याशी बांधीलकी मानुन कार्य करणे.

२) प्रामाणिक पणा - आपले कर्तव्य जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे. कुठल्याही अवैध लाभाची अपेक्षा न ठेवणे भ्रष्टाचाराला बळी न पडणे व याला प्रखर विरोध करणे.

३) निर्भयता - समाजातील अन्याय, असत्य गोष्टी याविरूध्द मत नोंदविणे, संघर्ष करणे, न्यायाच्या बाजुने उभे राहण्याचे धाडस, निर्भयता नागरीकांमध्ये असणे हे सुदृढ समाजाचे लक्षण होय.

४) एकता - सामाजिक एकता समाजाला बळ देते. समाजात धार्मिक, जातीय किंवा अन्य बाबींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक करतात त्याला बळी न पडणे, प्राणपणाने विरोध करणे व एकता टिकवून ठेवणे हे महत्वाचे आहे.

५) सामाजिक जबाबदारी - समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपले कर्तव्य पार पाडणे. सामाजिक दृष्ट्या कर्तव्यदक्ष असणारे नागरिक समाजाला सुदृढ बनवितात. कायदे व नियम आपल्याच हितासाठी असतात त्यांचे काटेकोरपणे पालन करने हे आपले कर्तव्य आहे त्यामुळे सार्वजनिक शिस्त निर्माण होते.

६) वक्तशीरपणा – वेळेचे बंधन पाळणे, सार्वजनिक जीवनात वेळेला महत्व दिल्याने समाजाच्या गुणवत्तेत वाढ होते.

वैज्ञानिक दृष्टीकोन:

वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला पुढे नेण्यास मदत करतो. दैववाद, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, चुकीच्या रूढी परंपरा समाजासाठी पायात अडकलेल्या साखळदंडाप्रमाणे असतात यामुळे समाजाची प्रगती थांबते. यागोष्टी समाजाला दुर्बल व कमकुवत बनवतात. सार्वजनिक जीवनात साधनशुचिता, शुद्ध वर्तणूक ठेवणे, साधी राहणी आणि इतरांविषयीच्या संवेदना जपणे यामुळे समाज संस्कारशील बनतो. आपल्या राष्ट्रपुरुषांनी ज्या मूल्यांचा पुरस्कार केला, देशासाठी त्याग केला, बलिदान दिले, त्या मूल्यांची, त्यागाची सतत जाणीव ठेवणे व आचरण करणे हे महत्त्वाचे आहे. राष्ट्र पुरुषांविषयी केवळ अभिनवेश नसावा व त्यांची केवळ व्यक्तिपूजा नसावी!!

सुदृढ समाजाचेच महत्व:

सुदृढ समाज व्यवस्था हा सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्राचा पाया असतो. समाज व्यवस्था सुदृढ नसेल तर प्रगती पोकळ असते. अशा राष्ट्राचा डोलारा केव्हाही कोसळू शकतो. आपल्या समाजासमोर जातीय व्यवस्था, धर्मांधता, धार्मिक उन्माद, दैववाद, अंधश्रद्धा, बुरसटलेल्या रूढी-परंपरा, एकात्मतेचा अभाव, दारिद्र, आर्थिक व सामाजिक विषमता, स्त्रियांना दुय्यम स्थान व स्त्रियांवरील अत्याचार अशी अनेक आव्हाने आहेत. मागील एक हजार वर्षाचा इतिहास तपासला तर सुमारे आठशे वर्षे आपण परकियांच्या गुलामगिरीत होतो. जगातील जवळ - जवळ सर्वच वंशांच्या लोकांनी आपल्या देशावर आक्रमणे केली. आपण आक्रमणांना तोंड देऊ शकलो नाही, पराभूत झालो. याचे प्रमुख कारण म्हणजे चांगल्या समाजव्यवस्थेचा (वर वर्णन केल्याप्रमाणे) अभाव. सध्याच्या काळाचा विचार केला तर भारतीय मनुष्य बुद्धिमान आहे. भारतीयांची बुद्धिमत्ता जगाने मान्य केलीली आहे. भारतीय माणूस खूप कष्टाळू देखील आहे तरी देखील आपण विकसित, प्रगत राष्ट्र होऊ शकलो नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे सदोष समाज व्यवस्था!! विकसित वा प्रगत राष्ट्रांचा जर आपण अभ्यास केला, प्रगतीची कारणे शोधली तर आपल्या लक्षात येईल की अमेरिका, युरोपमधील देश, जपानसारख्या राष्ट्रांमध्ये अनेक वर्षाच्या प्रयत्नांनी एक सुदृढ समाज व्यवस्था निर्माण केलीली आहे. राष्ट्रप्रेम, बांधिलकी, सार्वजनिक जीवनातील शिस्त, वक्तशीरपणा, सार्वजनिक स्वच्छता, त्यांनी दिलेल्या शिक्षण व संशोधनावर भर, खोलवर रुजलेली कार्यसंस्कृती यासारख्या गोष्टींमुळे ही राष्ट्र विकसित झालेली आहेत. हे सर्व एका दिवसात वा आपोआप घडलेले नाही तिथे अनेक सामाजिक चळवळी उदा: लायन्स, रोटरी, रेड क्रॉस, स्काऊट तसेच अन्य सामाजिक चळवळी, स्वातंत्र्याच्या चळवळी यातून एक प्रगल्भ आदर्श समाजव्यवस्था निर्माण केली गेली. सामाजिक प्रबोधनाबरोबरच कठोर कायदे व त्यांची काटेकोर अंमलबजावणी करताना कोणाचाही अपवाद केला गेलं नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप केला गेला नाही. भ्रष्टाचारामुळे कायद्याच्या अंमलबजावणीत कुठेही कुचराई केली गेली नाही. यासर्व गोष्टींमुळे तिथली समाज व्यवस्था सुदृढ होण्यास व टिकण्यास मदत झाली. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील नेतृत्व! राजकीय वा सामाजिक बदलासांठी प्रभावी नेतृत्वाची गरज असते. आपल्या देशातदेखील स्वातंत्रपूर्व काळात राजकारणात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडीत नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद यांच्यासारखे उत्तुंग नेते तर सामाजिक क्षेत्रात महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, शैक्षणिक क्षेत्रात पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षि धोंडो केशव कर्वे, आध्यात्मिक क्षेत्रात संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज सारखी मानवतावादी नेतृत्वे लाभली. ही सर्व मंडळी नैतिकतेला सर्वोच्च प्राधान्य देणारी होती. त्यांनी केवळ उपदेश केला नाही तर या मुल्यांचे स्वतः काटेकोर आचरण केले, त्यामुळे समाजाचा त्यांच्यावर दृढ विश्वास होता. त्यांनी दिलेले आदेश समाजाने प्राणपणाने पाळले. आपल्या जीवनाची आहुती दिली. प्रचंड त्याग केला हा केवळ त्या नेत्यांच्या नैतिकतेचा आणि शुदध चारित्र्याचा प्रभाव होता. महात्मा गांधीना सुदृढ समाजाचे महत्व ठाऊक होते त्यामुळे त्यांनी राजकीय संघर्षाबरोबरच किंबहुना त्याहूनही अधिक लक्ष सामजिक सुधारणांकडे दिले. अस्पृश्यता निवारण, स्वावलंबन, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक जीवनातील साधन शुचिता, नैतिकतेचा, सत्याचा आग्रह याद्वारे सुदृढ समाजनिर्मीतीचे सातत्याने प्रयत्न केले. राजकीय परिषदांबरोबर सामाजिक परिषदा भरविल्या. आज नैतिक मुल्यांची होत असलेली घसरण, प्रचंड भ्रष्टाचार, तत्त्वहिन राजकारण, वाढती धर्मांधता, जातीयता, झुंडशाही लोकशाहीची उघडपणे होत असलेली गळचेपी यामुळे समाज दुर्बल होत आहे. समाजात नैराश्य निर्माण झालेले असून हतबलता आलेली आहे. अशावेळी हे दुरुस्त करण्यासाठी बाहेरून कुणीतरी येईल अशा भ्रमात राहणे योग्य नाही. लोकशाहीत ‘लोक’ हीच आशा आहे. लोकांना विशेषतः युवा वर्गाला संघटीत करून निर्माण झालेली लोकचळवळच याला उत्तर आहे. आपण करू शकतो! आपण हे केलेच पाहीजे!! जयहिंद लोकचळवळीने हे लोक अभियान सुरू केलेले आहे. वैचारिक चळवळीबरोबरच सुदृढ समाज निर्मीतीचा कृतिशील कार्यक्रम आखलेला आहे. ‘आपण यात सामील व्हा’ आपले या चळवळीत मनापासून स्वागत आहे !!!